Call Us: (+91) 022 2543 4331

 

"ज्ञान रचनावाद"

Sangeeta Chavanऑगस्ट २०१७ ते डिसेंबर २०१७ या काळात ग्राममंगल या संस्थेतर्फे ‘रचनावादीशिक्षण प्रणाली’ या विषया वर महिन्यातील एक शनिवार-रविवार असे प्रशिक्षण वर्ग आयाजित केले होते. सध्या चर्चेत असलेल्या ज्ञान रचना वादा बद्दल अनेक गोष्टी समजल्या हे प्रशिक्षण करत असताना, शिक्षण संदर्भातील अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. पहिल्या सत्राच्या स्त्रोत व्यक्ती होत्या डॉ वर्षां कुलकर्णी

हा वर्ग चालू झाला तेव्हा आपण नक्की काय समजून घेणार आहोत या बद्दल साशंक होते. पहिल्या वर्गात वर्षा ताईंनी आम्हालाच विचारले की शाळेतील कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत? ज्या गोष्टींची यादी आम्ही काढली त्या गोष्टी जर आपण मुलांना करायला सांगत असू तर त्या गोष्टी कालबाह्य तर आहेतच पण मुलांच्या भावनिक दृष्टीने पण त्या योग्य नाहीत याची माहिती मला मिळाली.

वर्तनवाद हा शब्द मला प्रथम इथे समजला. मुलांनी एखादी गोष्ट शिकावी म्हणून आपण वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करतो. त्या म्हणजे

1) सराव

2) पारितोषिक

3) शिक्षा

हे मार्ग अवलंबल्यामुळे मुलांना विषयाचे आकलन झाले आहे का याचा विचारच केला जात नाही. पुढे कोण याची फक्त चढाओढ दिसते. विद्यार्थ्यांना विषयाचा आशय कळला का याचा विचार होत नाही. त्याचप्रमाणे जर विद्यार्थी उत्तम प्रतिसाद देत असेल तर तो कोणत्या कारणामुळे आहे हेही पाहिले जात नाही. आपल्या शिक्षण प्रक्रियेमध्ये ह्याच गोष्टींना प्राधान्य दिल्याचे जाणवते.

वर्तनवादातील काही गोष्टी काळानुसार बदलण्याची गरज आहे. त्या म्हणजे

1) आशयापेक्षा विषयाला महत्व

2) प्रतिसाद महत्वाचा आकलन नाही

3) मुलांच्या भावभावनांचा विचार न करणे.

वरील सर्व गोष्टींचा वापर आपण मुलांनी शिकावे यासाठी करतो त्या बदलण्याची गरज आहे.

दुसर्या स्त्रोत व्यक्ती होत्या अश्विनी गोडसे. ताईंनी आम्हाला आकलनवाद या विषयाचे विवरण केले. मुलांची आकलन करण्याची क्षमता ही वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असते. ती म्हणजे

1) चित्रातून

2) प्रत्यक्ष अनुभवातून

3) इतरांच्या अनुभवातून

शिकण्यासाठी मुले शारीरिकदृष्ट्या त्याचप्रमाणे मानसिकदृष्ट्या तयार असावी लागतात. नवीन गोष्ट शिकण्याची जिज्ञासा त्यांच्यामध्ये तयार होण्याची गरज आहे. तसेच, जर आपण त्यांना वेगवेगळे अनुभव दिले तर त्यांची शिकण्याची प्रक्रिया सोपी होते याचं कारण हे की प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकाराने शिकतो. त्याचं शिकणं हे त्याच्या पुर्वानुभवावर आधारित असते. जर त्याचे शाळेतील वातावरण आनंदी, आश्वासक व ताणरहित असेल तर शिक्षण जास्त चांगल्या पद्धतीने होईल. या पद्धतीने घेतलेलं शिक्षण हे दीर्घकाळ लक्षात राहणारे असते.

या अभ्यासवर्गातून मला मेंदूविषयक संशोधन आणि मेंदू आधारित शिक्षण या विषयाचे सखोल ज्ञान मिळाले. मेंदू हा शिकण्याचा अवयव आहे हे सुद्धा समजले. जर मेंदू कळला तर त्याचा योग्य वापर करता येतो. कोणतीही नवीन गोष्ट शिकत असताना मेंदू हा त्यासाठी तयार असायला हवा. बौद्धिक मेंदू कार्यरत असेल तर शिकण्याची प्रक्रिया सोपी होते. त्यामुळे शिक्षण हे नेहमी मेंदू आधारीत किंवा मेंदू पूरक असावे. मनाची एकाग्रता, कल्पकता, विचारशक्ती या मेंदूतील रासायनिक स्वरूपाच्या क्रिया प्रक्रिया आहेत. त्यामुळे मुलांचे शिक्षण चांगले करायचे असेल तर मूल समजून घेणे आवश्यक आहे. त्यांच्या गरजा माहित करून त्याप्रमाणे किंवा त्यावर बेतलेले शिक्षण असावे.

पियाजे हा मानसशात्रज्ञ असे म्हणतो “ आपण जेव्हा मुलांना एखादी गोष्ट शिकवतो तेव्हा ती गोष्ट स्वतःहून स्वतःच्या पद्धतीने शिकण्याची संधी आपण हिरावून घेतो”.

यावरून एक गोष्ट समजते की मुलांना जास्तीत जास्त शिकण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे मुलं मानसिकदृष्ट्य़ा सक्षम आहेत का हा महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. मुलांना जेवढे जास्त ज्ञानेंद्रीयाचे अनुभव मिळतील तेवढे देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.शिक्षण हे जगण्याशी निगडीत असते. आपण जे शिकतो ते आपल्याला व्यवहारात वापरता आले पाहिजे. जर मुलांना भाषिक, सांगेतिक, बौद्धिक व भावनिक अनुभव दिले तर वेगवेगळ्या प्रसंगात कसे वागावे याचे वेगळे प्रशिक्षण देण्याची वेळ येणार नाही. विद्यार्थी जेव्हा गटात काम करतात तेव्हा जास्त प्रगल्भ होतात कारण एकाच गोष्टीकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो. याचा फायदा मात्र सर्वांनाच होतो.

एक रचनावादी शिक्षक होण्यासाठी खालील गोष्टींची पूर्तता होणं गरजेचं आहे.

1) शिकण्याची संधी देणे

2) आकलनाला महत्व देणे

3) पाठ्यपुस्तक जीवनाशी जोडता येणे

4) वयानुरूप शिक्षण

5) शिक्षारहीत शिक्षण

6) मुलांचे मित्र किंवा सहाय्यक होणे

7) विचार करण्यास वेळ देणे

8) शिकण्यासाठी पूरक वातावरण करणे.

जून्या पद्धतीत काळानुरूप बदल करण्याची गरज आहे. जर त्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार असेल तर नक्कीच हा विचार केला गेला पाहिजे.

संगीता चव्हाण

Saraswati Mandir Trust, Thane

saraswati mandir trust thane